Pune Prime News : मथुरा येथील यमुना एक्स्प्रेस वे वर आज १२ फेब्रुवारीला सकाळी कार आणि बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. खासगी स्लीपर बसचे मथुरेत टायर पंक्चर झाल्यामुळे बस गाडीचे नियंत्रण सुटले आणि बस दुभाजकाला धडकली. यानंतर बसने कारला धडक दिली. या घटनेत दोन्ही वाहनाने पेट घेतला. या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, महावन पोलीस स्टेशन हद्दीत आग्राहून नोएडाला जाणारी खासगी स्लीपर बसचे मथुरेत टायर पंक्चर झाले. यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दुभाजकाला धडकली. या बसची स्विफ्ट डिझायर कारला धडक बसल्याने बसच्या डिझेल टाकीला आग लागली. या आगीत दोन्ही वाहने जळून खाक झाली. आग इतकी भीषण होती की, कारमधील पाचही प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. अपघातग्रस्त बसमध्ये सुमारे ५० प्रवासी होते. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.