छत्तीसगड : छत्तीसगडमधून एक भीषण अपघाताची माहिती समोर येत आहे. कावर्धा येथे पिकअप वाहन उलटून १७ जण ठार झाले आहेत. तर २५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. या भीषण अपघातात सर्वजण आदिवासी असून, मृतांमध्ये १० महिलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
मिळालेली अधिक माहिती अशी की, बैगा आदिवासी समाजातील २५ ते ३० नागरिकांचा एक गट तेंदूपत्ता गोळा करून पिकअप ट्रकमधून परतत होता. यावेळी बहपनी परिसरात त्यांचे वाहन २० फूट खोल खड्ड्यात पडून हा अपघात झाला आहे. जखमींना पुढील उपचारासाठी जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्व जण कुई येथील रहिवासी असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत कावर्धाचे पोलिस अधिक्षक अभिषेक पल्लव म्हणाले की, छत्तीसगडमधील कावर्धा परिसरात पिकअप वाहन पलटल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १७ जण जागीच ठार झाले, तर ८ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.