नवी दिल्ली : ‘बीबीसी’ या वृत्तवाहिनेने अलीकडेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गुजरात दंगलीच्या संदर्भात ‘इंडिया : द मोदी क्वेशन’ नावाचा माहितीपट प्रसिद्ध केला होता. यात बीबीसीने गुजरात दंगलीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावरून बराच गदारोळ देखील सुरु आहे. केंद्र सरकारने देखील या माहितीपटावर बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी सर्वाना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करताना इशारा देखील दिला आहे.
दिल्लीतील कॅन्टोन्मेंटमधील करिअप्पा मैदानावर राष्ट्रीय छात्र सेनेच्या तरुणांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधला. तेव्हा पंतप्रधान म्हणाले, “देशात एकमेकांत मतभेद आणि फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, आपण सर्वांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत” असा सूचक इशारा पंतप्रधान मोदींनी दिला.
‘भारतमातेच्या मुलांमध्ये फूट पाडण्यासाठी अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहेत. पण, देशातील लोकांमध्ये कधीही मतभेद होणार नाहीत. यासाठी एकता हाच अंतिम पर्याय आहे. एकता हीच भारताची ताकद आहे’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.
‘इंडिया : द मोदी क्वेशन’ नक्की आहे काय…?
बीबीसीने सन २००२ साली झालेली गुजरात दंगल व तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा माहितीपट दोन भागांमध्ये तयार केला आहे. माहितीपटाच्या प्रदर्शनानंतर अनेकांनी यावर अपेक्ष घेताना हे व्हिडीओ निवडक प्लँटफॉर्म वरून काढण्यात आले. हा माहितीपट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात तयार करण्यात आलेला ‘प्रोपगंडा’ असल्याचा आरोप केंद्र सरकारच्या वतीने करण्यात येत आहे.