नवी दिल्ली: तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याच्या आरोपप्रकरणी त्यांची हकालपट्टी करण्याची शिफारस करणारा एथिक्स कमेटी सोमवारी (4 डिसेंबर) लोकसभेत अहवाल सादर करणार आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन याच दिवसापासून म्हणजेच ४ डिसेंबरपासून सुरू होत असून ते २२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
भाजप खासदार विनोद कुमार सोनकर यांच्या अध्यक्षतेखालील एथिक्स कमेटीने मोईत्रा यांची हकालपट्टी करण्याची शिफारस केली होती. समितीच्या सहा सदस्यांनी हकालपट्टीच्या अहवालाचे समर्थन केले तर चार सदस्यांनी विरोध केला. हा अहवाल 10 नोव्हेंबर रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठवण्यात आला होता.
या काळात मोईत्राही समितीसमोर हजर झाल्या. त्यांना वैयक्तिक प्रश्न विचारण्यात आल्याचा आरोप त्यांनी आणि समितीमध्ये समाविष्ट असलेल्या इतर विरोधी खासदारांनी केला होता. तो फेटाळून लावत विनोदकुमार सोनकर यांनी तसे झाले नाही, असे म्हटले होते.
अलीकडेच भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी असा दावा केला होता की, महुआ मोईत्रा यांनी अदानी समूहाशी संबंधित प्रकरणात संसदेत प्रश्न विचारण्यासाठी उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे आणि महागड्या भेटवस्तू घेतल्या होत्या. यानंतर दुबे यांनी याबाबतची तक्रार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केली आणि कारवाईची मागणी केली. मग बिर्ला यांनी हे प्रकरण एथिक्स कमेटीकडे सोपवले.
दुबे यांच्या आरोपांवर दर्शन हिरानंदानी यांनी स्वाक्षरी केलेले प्रतिज्ञापत्र समोर आले होते. त्यात त्यांनी होय, मोईत्राला पैसे आणि भेटवस्तू दिल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी मोइत्रा यांनी संसदेत अदानी समूहाशी संबंधित प्रश्न विचारले आहेत, असा दुबे यांनी केला होता.