औरैया (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील मोहित यादव नावाच्या २७ वर्षीय अभियंत्याने पत्नीच्या कथित छळामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एका सिमेंट कंपनीत फील्ड इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या मोहितने सात वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर प्रिया यादवशी लग्न केले होते. तथापि, प्रियाला बिहारमध्ये प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून शासकीय नोकरी मिळाल्यानंतर परिस्थिती बिकट झाली. मोहितच्या कुटुंबीयांच्या मते, सरकारी नोकरी मिळाल्यानंतर प्रियाचा स्वभाव बदलला तिने तिच्या आई आणि भावाच्या सांगण्यावरून मोहितला त्रास देण्यास सुरुवात केली. मृत्यूपूर्वी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मोहितने आरोप केला आहे की, त्याची पत्नी आणि सासरच्या लोकांनी त्याचा मानसिक छळ केला. त्याने असाही दावा केला आहे की, त्याच्या पत्नीने आईच्या सांगण्यावरून माझ्या संमतीशिवाय गर्भपात केला आहे आणि जर त्याने त्याची मालमत्ता तिच्या नावावर केली नाही तर त्याला आणि त्याच्या कुटुंबाला हुंड्याच्या खोट्या खटल्यात अडकवण्याची धमकीही दिली होती.
माझ्या मृत्यू पश्चात न्याय मिळाला नाही, तर माझी राख नाल्यात फेकून द्या. मला माफ करा. आई, बाबा मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही, पुरुषांसाठी कायदा असता तर हे पाऊल मी उचलले नसते, पत्नी आणि सासरच्या लोकांकडून होणारा मानसिक छळ मी सहन करू शकलो नाही, म्हणून आत्महत्या करत आहे, असे मोहितने व्हिडीओमध्ये सांगून जीवनयात्रा संपवली आहे.
मोहितच्या कुटुंबाने आता त्याच्या आत्महत्येप्रकरणी न्यायाची मागणी केली आहे, असा आरोप करत आहे की, त्याची पत्नी आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांकडून होणाऱ्या छळामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली आहे आणि पुरुषांना छळ आणि खोट्या गुन्ह्यांपासून संरक्षण देण्यासाठी अधिक कडक कायदे करण्याची गरज आहे याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मोहितने त्याच्या व्हिडिओमध्ये केलेल्या आरोपांबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि चौकशी सुरू आहे.