नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखा जाहीर होण्यास फारसा वेळ शिल्लक नाही. या तारखांची घोषणा होण्यापूर्वीच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. वर्तमान निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत होता.
अरुण गोयल यांनी निवडणूक आयुक्तपदाचा राजीनामा दिल्याची माहितीही कुणाला नव्हती, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 2027 पर्यंतचा कार्यकाळ असल्याने अरुण गोयल त्यापूर्वी राजीनामा देतील, अशी कोणालाच अपेक्षा नव्हती.
नुकतेच निवडणूक आयोगाचे पथक पश्चिम बंगालच्या दौऱ्यावरून परतले
लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तयारीत त्याच्या सक्रियतेबद्दल बोलायचे झाले तर, पुढील 3 दिवसांनी आयोगाला जम्मू-काश्मीरला भेट द्यायची आहे. त्याचवेळी, निवडणूक आयोग अवघ्या 2 दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावरून परतला आहे. अशा परिस्थितीत अरुण गोयल यांच्या अचानक राजीनाम्यामागे कोणतेही विशेष कारण समोर आलेले नाही. शनिवारी (९ मार्च) केंद्रीय कायदा व न्याय मंत्रालयाकडून त्यांचा राजीनामा स्वीकारण्याबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली.
सध्या मुख्य निवडणूक आयुक्तांव्यतिरिक्त अरुण गोयल हेही निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत होते. तर आयोगात एकूण 3 जण आहेत. म्हणजे या परिस्थितीनंतर आता आयोगात फक्त मुख्य निवडणूक आयुक्त उरले आहेत.