Election Commission News : महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज निवडणूक आयोग जाहीर करणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये आज विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. आज निवडणूक आयोग 3 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे.
Election Commission of India to announce the schedule for General Election to Legislative Assemblies, today. pic.twitter.com/EckI51NcMI
— ANI (@ANI) August 16, 2024
लोकसभेची निवडणूक शांततेत पार पडल्यानंतर निवडणूक आयोग आता विधानसभा निवडणुका घेण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीबाबतही निवडणूक आयोग काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जम्मू काश्मीरमधून 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होणार आहेत.
महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. हरियाणा विधानसभेची मुदतही 3 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे या दोन राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. तसेच 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात. 2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. यंदा कधी मतदान होणार? हे निवडणूक आयोग आज जाहीर करणार आहे.