हैदराबाद: रामोजी फिल्म सिटी आणि ईनाडूचे संस्थापक रामोजी राव यांचे शनिवारी निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. राव हे अनेक दिवसांपासून आजारी होते. शनिवारी पहाटे ३.४५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रामोजी राव यांच्यावर हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना ५ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना हृदयाशी संबंधित समस्या होत्या. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता.
रामोजी राव यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या रामोजी फिल्मसिटी येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. जेथे कुटुंब, मित्र आणि हितचिंतक त्यांना अंतिम श्रद्धांजली अर्पण करतील.
रामोजी राव यांचे पूर्ण नाव चेरुकुरी रामोजी राव होते. त्यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1936 रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पेदापरुपुदी येथे झाला. देशातील व्यवसाय, प्रसारमाध्यमे आणि चित्रपट निर्मिती या क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी ते ओळखले जातात. त्यांनी रामोजी ग्रुपची स्थापना केली, ज्यामध्ये फिल्म स्टुडिओ रामोजी फिल्म सिटी व्यतिरिक्त, ईटीव्ही नेटवर्क, डॉल्फिन हॉटेल्स, मार्गदर्शी चिटफंड आणि ईनाडू तेलुगू वृत्तपत्र यांचा समावेश आहे. 2016 मध्ये त्यांना शिक्षण, पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
रामोजी फिल्म सिटीची स्थापना
दक्षिण भारतातील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि पद्म पुरस्कार विजेते रामोजी राव यांनी 1996 मध्ये रामोजी फिल्म सिटीची स्थापना केली होती. चित्रपट निर्मितीशी निगडीत अडचणी पाहून त्यांनी अशा फिल्म सिटीची कल्पना केली होती, ज्यामध्ये चित्रपट निर्माते येथे फक्त स्क्रिप्ट घेऊन येतात आणि चित्रपट घेऊन परत जातात, असे म्हणतात. येथे दरवर्षी सुमारे 200 चित्रपटांचे चित्रीकरण होते. आत्तापर्यंत येथे सुमारे 2000 चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.
यात हिंदी, भोजपुरी, तेलुगु, तमिळ, कन्नड, मल्याळम, बंगाली, ओरिया आणि इतर भाषांमधील चित्रपटांचा समावेश आहे. क्रिश-३, जय हो, रोबोट, किस्मत कनेक्शन, सरकार राज, गोलमाल, हिम्मतवाला, चेन्नई एक्सप्रेस आणि दिलवाले इत्यादी हिंदी चित्रपटांचा समावेश आहे. बाहुबली चित्रपटाच्या दोन्ही भागांचे शूटिंग येथे पूर्ण झाले.