श्रीनगर: जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या कथित घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. त्यांना मंगळवारी (13 फेब्रुवारी) तपास यंत्रणेसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, 2002 (PMLA) अंतर्गत त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. ईडीने 2022 मध्ये या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते.
फारुख अब्दुल्ला यांच्यावर काय आरोप?
आरोपपत्रात म्हटले आहे की, फारुख अब्दुल्ला यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळात जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी आणि इतर लोकांकडून मिळालेला निधी खेळाच्या विकासाच्या नावाखाली वळवला आणि त्याचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर केला. हा निधी अनेक खाजगी बँक खाती आणि जवळच्या नातेवाईकांना पाठवण्यात आला. नंतर हा निधी आपापसात वाटून घेतला.
किती कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप?
2018 मध्ये, ईडीने सीबीआयच्या आरोपपत्राच्या आधारे या प्रकरणात पीएमएलएची चौकशी सुरू केली. BCCI ने असोसिएशनला 112 कोटी रुपये दिले होते. त्यातून 43.6 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. 2001 ते 2012 दरम्यान फारुख अब्दुल्ला जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असताना हा कथित घोटाळा झाला होता.
गेल्या महिन्यातही पाठवण्यात आले होते समन्स
लोकसभेत श्रीनगरचे प्रतिनिधीत्व करणारे 86 वर्षीय फारुख अब्दुल्ला यांनाही गेल्या महिन्यात याच प्रकरणात तपास यंत्रणेने समन्स बजावले होते. त्यावेळी प्रकृतीचे कारण सांगून ते श्रीनगर येथील ईडी कार्यालयात हजर राहिले नाहीत.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यानंतर फारुख अब्दुल्ला हे नवे विरोधी पक्षाचे नेते आहेत, ज्यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली आहे.