नवी दिल्ली: केंद्रीय तपास यंत्रणा ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी मोठी कारवाई करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी पुन्हा एकदा समन्स पाठवले आहे. तपास यंत्रणेच्या सूत्रानुसार, दिल्ली सरकारच्या अबकारी धोरण भ्रष्टाचार प्रकरणात चौकशीसाठी हे समन्स पाठवण्यात आले आहे. सूत्राने सांगितले की, पुढील वर्षी 3 जानेवारी रोजी तपास यंत्रणेने त्यांना सकाळी 10:30 ते 11 या वेळेत ईडीच्या मुख्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे.
आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक केजरीवाल यांना पाठवलेली ही तिसरी नोटीस आहे. यापूर्वी त्यांना 2 नोव्हेंबर आणि 21 डिसेंबर रोजी नोटीस बजावण्यात आली होती, मात्र त्यांनी एजन्सीसमोर हजर राहण्यास नकार दिला होता. मुख्यमंत्री सध्या विपश्यनेसाठी गेले आहेत.
दिल्ली सरकारच्या अबकारी धोरण भ्रष्टाचार प्रकरणात ईडीने 2 नोव्हेंबर रोजी केजरीवाल यांना चौकशीसाठी पहिले समन्स पाठवले होते, परंतु ते चौकशी प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आले नाहीत. त्यानंतर, त्यांना 21 डिसेंबर रोजी ईडीने दुसरे समन्स बजावले होते, परंतु या समन्सवरही ते ईडीच्या चौकशीसाठी ते आले नाहीत, कारण या काळात ते दिल्लीबाहेर गेले होते.
दुसऱ्या समन्सवर हजर राहण्यास नकार देताना केजरीवाल यांनी प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, त्यांच्याविरुद्ध जारी करण्यात आलेली वैयक्तिक हजर राहण्याची नोटीस “कायद्यानुसार नाही” आणि ती मागे घेण्यात यावी.