नवी दिल्ली: निवडणूक आयोगाने हरियाणामध्ये मतदानाची तारीख बदलली आहे. राज्यात आता ५ ऑक्टोबरला मतदान होणार असून ८ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहेत. याआधी राज्यात १ ऑक्टोबरला मतदान होणार होते, तर जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसह ४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार होता. आता 8 ऑक्टोबरला दोन्ही राज्यांचे निवडणूक निकाल जाहीर होणार आहेत. भाजपने निवडणूक आयोगाला पत्र लिहून मतदानाची तारीख बदलण्याची मागणी केली होती.
सण आणि सुट्ट्या लक्षात घेऊन निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी भाजपने केली होती, ती आता निवडणूक आयोगाने मान्य केल्याचे मानले जात आहे. निवडणुका पुढे ढकलण्याबाबत सांगण्यात आले की, १ ऑक्टोबर ही तारीख वीकेंड, सार्वजनिक सुट्ट्या आणि सणवार यांना जोडून येणारी आहे. 28-29 सप्टेंबर रोजी शनिवार आणि रविवार आहे. यानंतर बुधवार 2 ऑक्टोबर रोजी सुटी असल्याने अशा परिस्थितीत नागरिक शहराबाहेर जाण्याची शक्यता असल्याने मतदानाची तारीख बदलण्यात आली आहे.