नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेत्री व भाजप खासदार हेमा मालिनी यांच्यावर आक्षेपार्ह टीका करणे काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांना महागात पडले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी हेमा मालिनी यांच्यावरील टीकेप्रकरणी कारवाई करत सुरजेवाला यांच्यावर ४८ तासांची प्रचारबंदी लादली आहे. लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाल्यापासून प्रचारबंदीची ही पहिली कारवाई आहे.
आयोगाने गत मंगळवारी या प्रकरणात सुरजेवाला यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. सुरजेवाला यांचे वक्तव्य अतिशय असभ्य असून, आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारे असल्याचे आयोगाने म्हटले. सुरजेवाला यांना मंगळवारी सायंकाळी ६. वाजेपासून पुढच्या ४८ तासांत कुठल्याही प्रकारच्या प्रचारात सहभागी होण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. सुरजेवाला यांनी हरयाणातील एका निवडणूक सभेला संबोधित करताना हेमा मालिनी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.