राम नवमीच्या दिवशी अयोध्येमध्ये रामललांचे दर्शन घेण्यासाठी विमानाने जायचे असल्यास आज, मंगळवारी त्यासाठी २१ हजार रुपये तिकिटाचे दर मोजावे लागणार आहेत. तर, उद्या, बुधवारचे तिकीट ११ हजार २०० रुपयांदरम्यान आहे. मुंबईहून अयोध्येसाठी थेट विमानांच्या दोन सेवा आहेत. राम नवमीच्या आधी या विमानसेवेच्या तिकीटदरांमध्ये वाढ झालेली आहे.
यावर्षी‘राम नवमी’ बुधवारी (१७ एप्रिल) आहे. यासाठी मुंबईहून अयोध्येला रामलल्लाच्या दर्शनाला जाण्यासाठी विमान प्रवाशांनी गर्दी केली आहे. वाढत्या गर्दीमुळेच विमानसेवा कंपन्यांनी तिकीटदरही वाढवले आहेत. १६ एप्रिलचे दोन्ही विमानसेवांचे तिकीट २१ हजार ४०० रुपये आहे, तर १७ एप्रिलचे तिकीट ११ हजार २०० रुपये आहे.
यावर्षी २२ जानेवारी २०२४ ला अयोध्येमधील राम मंदिरात रामललांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेद्वारे मंदिराचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनावेळी देशभरात दिवाळी आणि जल्लोष साजरा करण्यात आला. या निमित्ताने देशातील वातावरणानुसार, येणा-या काळामध्ये अयोध्येत जाणाऱ्यांची संख्या वाढणार, हे निश्चित असल्याचे दिसून येते.
या गोष्टीचा विचार करुनच इंडिगो एअरलाइन्सने १५ जानेवारीपासूनच मुंबई ते अयोध्या अशी थेट विमानसेवा सुरू केली. त्यानंतर ‘स्पाइसजेट’ या कंपनीनेही अशी सेवा सुरू केली. आता १ एप्रिलपासून मुंबई विमानतळावरून दररोज दोन व साप्ताहिक १४ उड्डाणे अयोध्येला रवाना होत आहेत. इंडिगोचे विमान दुपारी २.३० वाजता रवाना होऊन सायंकाळी ४.४०ला अयोध्येच्या विमानतळावर उतरते. तर, स्पाइसजेटचे विमान दुपारी ४.४५ला रवाना होऊन सायंकाळी ४.५५ला अयोध्येत पोहोचते.