दिल्ली: दक्षिण दिल्लीतील (Delhi Crime) मदनगीर परिसरात एक धक्कादायक घटना (Delhi News) घडली आहे. 28 वर्षीय दिनेश यांच्यावर त्यांच्या पत्नीने झोपेत असताना उकळते तेल आणि मिरची पूड टाकली. या हल्ल्यात दिनेश गंभीर भाजले असून त्यांच्यावर सफदरजंग रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
दिनेश औषध कंपनीत कर्मचारी म्हणून काम करतात. 2 ऑक्टोबरच्या रात्री ते जेवण करून पत्नी आणि आठ वर्षांच्या मुलीसह झोपले होते. पहाटे 3:15 वाजता अचानक त्यांच्या शरीरात तीव्र जळजळ सुरू झाली. त्यांनी डोळे उघडले असता पत्नी साधना त्यांच्या अंगावर उकळते तेल ओतत असल्याचे दिसले. एवढ्यावरच ती थांबली नाही, तर त्यांच्या भाजलेल्या जखमांवर तिने मिरची पूड टाकली.
दिनेश यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी विरोध केला असता पत्नीने धमकी दिली – “जर आवाज केलास तर आणखी गरम तेल ओतेन.” मात्र वेदना असह्य झाल्याने दिनेश ओरडू लागले. त्यांचे आवाज ऐकून शेजारी आणि तळमजल्यावरील घरमालक धावले.
शेजाऱ्यांनी सांगितले की, साधनाने दरवाजा आतून बंद केला होता. बराच वेळ दरवाजा उघडण्यास नकार दिल्यानंतर अखेर ती बाहेर आली. दिनेश गंभीररीत्या भाजलेले दिसले. सुरुवातीला पत्नीच त्यांना रुग्णालयात नेण्याचा आग्रह करत होती, परंतु शेजाऱ्यांना संशय आल्याने घरमालकाने स्वतः ऑटो बोलावून त्यांना रुग्णालयात दाखल केले.
दिनेश आणि साधना यांचा विवाह आठ वर्षांपूर्वी झाला होता. त्यांच्यातील वादाला अनेक वर्षे झाली होती. दोन वर्षांपूर्वी साधनाने क्राइम अगेंस्ट वुमन सेलमध्ये तक्रारही दाखल केली होती, मात्र समुपदेशनानंतर प्रकरण मिटले होते. मात्र, अलीकडे पुन्हा भांडणे सुरू होती. घटनेच्या दिवशीही पती-पत्नीमध्ये वाद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधानातील कलम 118 (जाणीवपूर्वक दुखापत), 124 (धमकी) आणि 326 (गंभीर दुखापत) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप आरोपी पत्नीला अटक झालेली नाही. तिचा शोध पोलिस घेत असून मदनगीर परिसरात या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.







