नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राऊस एव्हेन्यू सत्र न्यायालयाकडून धक्का बसला आहे. सत्र न्यायाधीश राकेश सायल यांनी ईडीच्या तक्रारीवरून एसीएमएम कोर्टाने जारी केलेल्या समन्सला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. यानंतर आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 16 मार्च रोजी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी (ACMM) दिव्या मल्होत्रा यांच्या न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वैयक्तिक हजेरीतून सूट मिळावी, यासाठी सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यांच्या याचिकेवर गुरुवारी (14 मार्च) आणि शुक्रवारी (15 मार्च) दीर्घ सुनावणी झाली. विशेष न्यायाधीश राकेश सायल यांनी सांगितले की, कारवाईवरील स्थगिती फेटाळली आहे. परंतु, जर त्यांना हजर राहण्यापासून सूट हवी असेल तर ते ट्रायल कोर्टात अपील करू शकतात.
केजरीवाल यांच्याविरोधात समन्स बजावण्यात आले आहे
7 मार्च रोजी न्यायालयाने केजरीवाल यांना समन्स पाठवले होते. ईडीने आतापर्यंत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना 8 समन्स बजावले आहेत. मात्र, केजरीवाल एकदाही एजन्सीसमोर हजर झाले नाहीत. यामुळे ईडीने केजरीवाल यांच्याविरोधात न्यायालयात दोन तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानंतर अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी दिव्या मल्होत्रा यांनी केजरीवाल यांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते.