नवी दिल्ली: दिल्ली दारू प्रकरणात तिहार तुरुंगात बंद असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वैयक्तिक डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी त्यांच्या याचिकेवर आज राऊस अव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली. यामध्ये दोन्ही बाजूंनी आपापले युक्तिवाद मांडले. ईडीच्या वकिलांनी सांगितले की, जामिनासाठी वैद्यकीय आधार तयार करण्यासाठी केजरीवाल जाणूनबुजून गोड पदार्थ खाऊन मधुमेहाची पातळी वाढवत आहेत. केजरीवाल यांच्या वकिलांनी सांगितले की, मुख्यमंत्री फक्त तेच खात आहेत जे त्यांच्या डॉक्टरांनी त्यांच्यासाठी डाएट चार्टमध्ये लिहिले आहे. सुनावणीदरम्यान, ईडीतर्फे हजर असलेल्या वकिलांनी सांगितले की, या संदर्भात एम्सच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले होईल. न्यायालय स्वत:च्या वतीने वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे आदेश देऊ शकते, असेही संकेत दिले आहेत. यासोबतच केजरीवाल यांच्या याचिकेवरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला असून 22 एप्रिल रोजी निकाल देणार असल्याचे सांगितले.