Delhi Blast: राजधानी दिल्ली पुन्हा एकदा भीषण स्फोटाने हादरली आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ संध्याकाळी एका बेवारस कारमध्ये मोठा स्फोट झाला. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 24 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा स्फोट संध्याकाळी सुमारे 6 वाजून 55 मिनिटांनी झाला.

स्फोट इतका प्रचंड होता की त्याचा आवाज लाल किल्ला परिसरासह काही किलोमीटर अंतरावर ऐकू गेला. स्फोटानंतर गाड्यांमध्ये आग लागली आणि परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला. ज्या लोकांनी ती घटना प्रत्यक्ष पाहिली त्यांनी सांगितले की, काही क्षणांसाठी सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि लोक भीतीने धावत सुटले. अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्यात आली.
स्फोट झालेली कार दीर्घकाळापासून त्याच ठिकाणी उभी होती, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या कारचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले आहेत. स्फोटानंतर दिल्ली पोलिसांची स्पेशल टीम, फॉरेन्सिक विभाग आणि सादीकनगर पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. जखमींना जवळील LNJP रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटानंतर परिसर सील करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या स्फोटानंतर दिल्लीसह मुंबईत आणि शेजारील राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान आणि उत्तराखंड राज्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संपूर्ण दिल्लीमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. महाराष्ट्र सदनचे गेट सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आले आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की काही काळ आपण मरणार असा भास झाला. स्फोटानंतर पोलिसांनी तातडीने परिसर रिकामा करून तपासासाठी फॉरेन्सिक तज्ञांना बोलावले आहे. या घटनेत दहशतवादी कटाचा संशय व्यक्त केला जात असून तपास एनआयए आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून केला जात आहे.
स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी प्राथमिक तपासानुसार कारमध्ये स्फोटक पदार्थ असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






