नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर राजकारणापासून दूर राहण्याचा सिलसिला सुरूच आहे. गौतम गंभीर आणि जयंत सिन्हा यांच्यानंतर आता दिल्लीचे ज्येष्ठ नेते डॉ.हर्षवर्धन यांनीही राजकारणातून संन्यास घेण्याचे संकेत दिले आहेत.
शनिवारी सायंकाळी उमेदवारांची घोषणा करताना भाजपने डॉ. हर्षवर्धन यांचे तिकीट कापले होते. त्यांच्या जागी पक्षाने प्रवीण खंडेलवाल यांना तिकीट दिले आहे. यानंतर डॉ. हर्षवर्धन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक लांबलचक पोस्ट लिहून राजकारणातून दूर होण्याच्या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी लिहिले की, ‘तीस वर्षांहून अधिकच्या निवडणूक कारकिर्दीत मी पाच विधानसभा आणि दोन लोकसभा निवडणुका लढवल्या, ज्या मी मोठ्या फरकाने जिंकल्या. पक्ष संघटना, राज्य आणि केंद्र सरकारमध्ये अनेक प्रतिष्ठित पदे भूषवली. पण आता माझ्या मूळ ठिकाणी परत येण्याची वेळ आली आहे.
त्यासोबत त्यांनी लिहिले की, ‘पन्नास वर्षांपूर्वी मी कानपूरच्या जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजला MBBS मध्ये गरीब आणि गरजूंना मदत करण्याच्या इच्छेने प्रवेश घेतला. तेव्हा मानवतेची सेवा हे माझे ध्येय होते. मनापासून एक स्वयंसेवक आहे. मी रांगेतील शेवटच्या माणसाची सेवा करण्यासाठी झटणाऱ्या दीनदयाल उपाध्याय यांच्या तत्त्वज्ञानाचा नेहमीच उत्कट प्रशंसक राहिलो आहे. आरएसएसच्या तत्कालीन नेतृत्वाच्या विनंतीवरून मी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती, असं देखील हर्षवर्धन म्हणाले.
आपल्या पोस्टमध्ये डॉ. हर्षवर्धन यांनी त्यांच्या तीन दशकांच्या राजकीय प्रवासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही कौतुक केले आणि ते पुन्हा सत्तेवर येण्यासाठी देशाला शुभेच्छा दिल्या.
After over thirty years of a glorious electoral career, during which I won all the five assembly and two parliamentary elections that I fought with exemplary margins, and held a multitude of prestigious positions in the party organisation and the governments at the state and…
— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) March 3, 2024
यासोबत त्यांनी म्हटले आहे की, माझ्याकडे असलेल्या अनेक गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. त्यासाठी तुमचे आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी असतील. माझे कृष्णा नगर येथील ईएनटी क्लिनिकही माझ्या परतीची वाट पाहत आहे, असं हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.