बिहार : बिहारच्या बेगुसरायमध्ये एक अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करून पती-पत्नी आपल्या दोन चिमुकल्यांसह घरात निवांत झोपले होते. मात्र, रात्रीच्या वेळी घराला अचानक आग लागली. या आगीत चौघांचाही होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी १ जानेवारीला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. नीरज पासवान, कविता देवी, लव (वय ५) आणि कुश (वय ३) अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मृत नीरज पासवान, पत्नी कविता आणि दोन चिमुकल्या मुलांसह बेगुसराय जिल्ह्यातील नवतोलिया गावात राहत होते. सोमवारी नीरज यांनी पत्नी आणि दोन मुलांसोबत नवीन वर्षाचं सेलिब्रेशन केलं, आणि रात्री जेवण करून सर्वजण गाढ झोपी गेले. मात्र, त्याचवेळी अचानक घराला आग लागली. ही आग इतकी भयानक होती, की क्षणार्धात संपूर्ण घराला आगीचा विळखा पडला. गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. संपूर्ण पासवान कुटुंबाचं क्षणार्धात होत्याच नव्हतं झालं.
या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेची माहिती मिळातच पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. यानंतर पोलिसांनी चौघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. मृत कविता देवी ही आठ महिन्यांची गरोदर असल्याचं सांगण्यात येत आहे.