दिल्ली : रस्त्यांवर खड्डे असणं ही काही नागरिकांसाठी विशेष आणि मोठी बाब नाही. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होण्याचे आणि त्यात प्राण गमवावा लागण्याच्या घटना कायम घडत असतात. परंतु, एखाद्याचा जीव वाचला असं कधी ऐकायला मिळत नाही. मात्र, खड्ड्यांमुळे एक मृत्यू झालेले आजोबा जिवंत झाले. दरम्यान, एका व्यक्तीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं, पण रस्त्यातील खड्ड्यात रुग्णवाहिका गेल्यानं व्यक्ती जिवंत झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे.
एनडीटीव्हीच्या एका रिपोर्टनुसार, दर्शन सिंह बराड यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. दर्शन सिंह यांचे कुटुंबिय त्यांचा मृतदेह घेऊन पटियालाहून कर्नालला त्यांच्या घरी निघाले होते. त्यांच्या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. गावात यासाठीची तयारीही पूर्ण झाली होती. मात्र, मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचे चाक कॅथल ढांडजवळ एका खड्ड्यात अडकल्याने जोरात दणका बसला.
रुग्णवाहिकेत दर्शन सिंह यांच्या मृतदेहासोबत त्यांचा नातू होता. रुग्णवाहिकेला जोरात दणका बसल्यानंतर दर्शन सिंह यांचा हात हलत असल्याचं नातवाने पाहिलं. तसेच त्यांच्या हृदयाची धडधड जाणवताच रुग्णवाहिकेच्या चालकाला जवळच्या रुग्णलयात नेण्यास सांगण्यात आलं. त्याच रुग्णालयात दर्शन सिंह यांना नेण्यात आलं, जिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं होतं. तिथून डॉक्टरांनी दर्शन सिंह यांना कर्नालमधील रुग्णलयात पुढील उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिला. आता दर्शन सिंह यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, या घटनेला दर्शन सिंह यांचे कुटुंबिय चमत्कार मानत असून आता ते लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करत आहेत.