Dawood Ibrahim : मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम याला पाकिस्तानच्या कराचीतील एका खासगी रूग्णालयात भरती केल्याची माहिती समोर येत आहे. एका अज्ञात व्यक्तीनं विषप्रयोग केल्यानंतर कुख्यात डॉन दाऊदची तब्येत बिघडली आणि त्यानंतर प्रकृती चिंताजनक झाल्यानं त्याला रूग्णालयात भरती करण्यात आल्याचं कळतंय. एका हिंदी वृत्तवाहिनीने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
मात्र यासंदर्भात भारत किंवा पाकिस्तान सरकारकडून कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अशातच पाकिस्तामधील कराची, इस्लामाबाद आणि रावळपिंडी या तीन महत्वाच्या शहरांमध्ये इंटरनेटसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारं दाऊदबाबतचं वृत्त खरं असल्याचंही बोललं जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दाऊद इब्राहिमला कराचीतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. सोशल मीडियावर अनेक यूजर्सकडून देखील दावा केला जात आहे. कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं विषप्रयोग केल्याचा दावा केला जात आहे. यामुळे दाऊदला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दाऊदच्या टोळीतील एका माजी सदस्यानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून दाऊद गंभीर आजारामुळे त्रस्त असून कराचीतील एका रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आलं होतं. त्याला कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आलं आहे. दाऊदला रुग्णालयातील ज्या मजल्यावर दाखल करण्यात आलं आहे, तिथे कोणालाही जाण्याची परवानगी नाही. केवळ उच्चपदस्थ अधिकारी आणि कुटुंबातील जवळचे लोकच तिथे जाऊ शकतात. अशी माहिती देण्यात आली आहे.