Coronavirus Update : मुंबई : देशासह राज्यातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात सध्या 100 हून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईतही 19 कोरोना रुग्ण आढळले आहेत, मात्र दिलासादायक बाब म्हणजे यातील एकही रुग्ण नवीन JN1 व्हेरियंटचा नाही. सध्या सर्व रुग्णांवर उपचार सुरु आहेत. केरळ, दिल्ली, गोवा, गुजरात आणि कर्नाटकात वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून बैठक देखील घेण्यात आली. या बैठकीमध्ये केंद्राकडून राज्यांना अलर्ट मोडवर राहण्यास सांगितले आहे. रुग्णालयाची तयारी, देखरेख आणि मॉक ड्रिलसह तयार राहण्याच्या सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत.
मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. कोरोनाचा जे एन 1 नावाचा नवा व्हेरीयंट सापडला आहे. मात्र, हा व्हेरीअंट सौम्य स्वरुपाचा आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नका असे सांगण्यात आले आहे. मुंबई उपाययोजना आणि सुविधांनी सुसज्ज आहे. रुग्णालयातील खाटा, औषधे यांचा आढावा घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या गाईडलाईननुसार पुढील तयारी सुरु आहे. टेस्टींग करुन नव्या व्हेरीयंटचं संक्रमण तपासण्यात येणार आहे. आरटीपीसीआर टेस्ट वाढवण्यात येणार आहेत. मुंबई महापालिकेच्या आरोग्य कार्यकारी अधिकारी दक्षा शाह यांनी सांगितलं आहे.
राज्यासह देशभरात कोरोनाच्या नव्या JN1 व्हेरियंटचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग आणि पालिका प्रशासन सतर्क झालं आहे. दरम्यान, कोरोनाचा नवा JN1 व्हेरियंट सौम्य असल्याने नागरिकांनी घाबरू नका, मात्र काळजी घ्या, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.