COVID-19 : अमेरिकेत कोरोनाने पुन्हा एकदा तोंड वर काढलं आहे. गेल्या दोन वर्षांत देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले असून यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या सांडपाणी डॅशबोर्डने याला दुजोरा दिला आहे. सीडीसीने सांगितले की, सध्या अमेरिकेत कोरोना महामारीची मोठी लाट सुरू आहे. लोकांच्या घरातून बाहेर पडणाऱ्या गटाराच्या पाण्यावरून हा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत सांडपाण्याच्या पाण्यात सर्वाधिक विषाणूजन्य क्रियाकलाप दिसून आला आहे.
कोविडची पातळी आणखी वाढू शकते : सीडीसी
सीडीसीने सांगितले की 10 ऑगस्ट रोजी घेतलेल्या नमुन्यात, विषाणूजन्य क्रियाकलाप 8.82 वर पोहोचला आहे, जो जुलै 2022 च्या 9.56 पेक्षा थोडा कमी आहे. सध्या अमेरिकेत कोरोनाची पातळी शोधण्यासाठी सांडपाणी हा एकमेव मार्ग आहे. तसेच पुढे सीडीसीने म्हटले आहे की कोविडची पातळी आणखी वाढू शकते. मे महिन्यात कोविडच्या वाढीदरम्यान, अमेरिकेत व्हायरल क्रियाकलाप 1.36 होता. CDC उपसंचालक डॉ. जोनाथन योडर यांनी एका ईमेलमध्ये म्हटले आहे की, ‘सध्या, राष्ट्रीय स्तरावर COVID-19 सांडपाणी विषाणूजन्य क्रियाकलापांची पातळी खूप जास्त असून यामध्ये पश्चिम यूएस क्षेत्र आघाडीवर आहे.’ त्यांनी सांगितले की, मागील वर्षांच्या तुलनेत यावेळी मात्र कोरोनाची लाट लवकर येत आहे, तर मागील वर्षांमध्ये ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या शेवटी ही क्रिया वाढायची.
मृत्यूदरही सातत्याने वाढत आहे..
सीडीसीने सांगितले की, कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूदरही सातत्याने वाढत आहे. सध्या तरी तो चिंताजनक पातळीवर पोहोचलेला नाही. सीडीसीच्या म्हणण्यानुसार, एक लाख लोकसंख्येमध्ये जुलै महिन्यापर्यंत 4 कोरोना बाधित रुग्ण रुग्णालयात दाखल होत होते. मे महिन्यात एक लाख लोकसंख्येपैकी केवळ एकच रुग्ण रुग्णालयात दाखल होता, तर जुलैपर्यंत हा आकडा चार पटीने वाढला आहे. तर दुसरीकडे, घरात राहून कोरोनावर उपचार करणारी लोकसंख्या मोठी आहे.
अमेरिकेच्या चिंतेत वाढ..
कोरोना रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेत आता आरोग्य विभाग पूर्वीसारख्या चाचण्या घेत नाही. अमेरिकेत आता रोजच्या चाचणीऐवजी सांडपाण्याच्या पाण्यातून कोरोना आढळून येत आहे. अमेरिकेत कोरोनाचे तीन प्रकार सक्रिय असल्याचे तपासात उघड झाले आहे. कोरोनाच्या बदलत्या स्वरूपामुळे लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार होत नाहीत, ही चिंतेची बाब ठरत आहे. यामुळे आता अमेरिकन शास्त्रज्ञही यावर चिंता व्यक्त करत आहेत.