नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षनिधी उभारण्याच्या हेतूने काँग्रेस पक्ष सोमवारपासून देशपातळीवर क्राऊड फंडिंग अभियान राबविले जाणार असल्याची माहिती पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या दिल्लीतील मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अभियानाविषयी माहिती दिली. पत्रकार परिषदेत काँग्रेसचे संघटन महासचिव के.सी. वेणुगोपाल व कोषाध्यक्ष अजय माकन हेसुद्धा सहभागी होते.
‘डोनेट फॉर देश’ नावाच्या या क्राऊड फंडिंग अभियानाद्वारे नागरिकाकडून तसेच काँग्रेसच्या प्रत्येक सदस्य आणि पदाधिकाऱ्यांकडून १३८ ते १३,८०० रुपयांपर्यतची देणगीही या मोहिमेतून घेतली जाणार असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केलं. दरम्यान, भारतात आतापर्यंतचे कोणत्याच राजकीय पक्षाकडून राबविले नसल्याचा तसेच सर्वात मोठं क्राऊड फंडिंग अभियान ठरणार असल्याचा दावाही काँग्रेसने केला आहे.
चांगल्या देशाच्या निर्मितीसाठी काँग्रेसला, देशाला तुमची गरज आहे, अशी टॅगलाईन या मोहिमेसाठी वापरण्यात येणार आहे. १९२०-२१ सालादरम्यान महात्मा गांधींनी राबविलेल्या ऐतिहासिक ‘तिलक स्वराज फंड’ या मोहिमेतून प्रेरणा घेत काँग्रेसने हे अभियान हाती घेतलं आहे. तसेच साधनसंपत्ती आणि संधींचे समान वाटप करणाऱ्या समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी पक्षाला सबळ करण्याच्या हेतूने हे अभियान राबविले जात असल्याचे वेणू गोपाल यांनी सांगितले.
राज्यस्तरीय पक्ष कार्यालयातील पदाधिकारी, निर्वाचित लोकप्रतिनिधी, जिल्हा व प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांना किमान १३८० रुपये देणगी देण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. तसेच २८ डिसेंबर रोजी पक्षाच्या स्थापना दिनापर्यंत हे अभियान केवळ ऑनलाइन पद्धतीनेच सुरु राहणार आहे. त्यानंतर पक्षाचे स्वयंसेवक घराघरापर्यंत पोहोचून लोकांकडून देणगी घेतील. प्रत्येक बुथमधील १० घरांतून प्रत्येकी किमान १३८ रुपये देणगी मिळावी, असे ध्येय निश्चित करण्यात आले असल्याचे कॉंग्रेसने सांगितले आहे.