नवी दिल्ली: उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी लोकसभा जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले. या दोन्ही जागांवर उमेदवारी अर्ज भरण्याचा आज म्हणजेच शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. अशा परिस्थितीत शेवटच्या क्षणी राहुल गांधी रायबरेलीतून आणि किशोरीलाल शर्मा अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्यामुळे प्रियांका गांधी निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. काँग्रेसने त्याची शुक्रवारी अधिकृत घोषणा केली आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी अमेठीमध्ये स्मृती इराणी यांच्याकडून पराभूत झाले, तर सोनिया गांधी रायबरेलीमधून विजयी झाल्या, परंतु यावेळी त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. आता त्या राज्यसभा सदस्य आहेत. त्याचवेळी राहुल गांधी केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढवत आहेत. गेल्या वेळी ते वायनाडमधूनच जिंकले होते. वायनाडमध्ये मतदान झाले आहे. अमेठी आणि रायबरेलीमध्ये २० मे रोजी मतदान आहे.
The following candidates have been selected by the Central Election
Committee for the ensuing elections to the Lok Sabha from Uttar Pradesh:36 – Rae Bareli: Sh. Rahul Gandhi
37 – Amethi: Sh. Kishori Lal Sharma pic.twitter.com/GFGD4QIEot— K C Venugopal (@kcvenugopalmp) May 3, 2024
;
नामांकनाची अंतिम तारीख ३ मे
२६ एप्रिलपासून अमेठी आणि रायबरेलीमध्ये नामांकन प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याची अंतिम तारीख ३ मे आहे. भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना अमेठीतून उमेदवार म्हणून घोषित केले आहे. स्मृती यांनी 29 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जही दाखल केला होता. त्याचवेळी भाजपने रायबरेलीमधून दिनेश प्रताप सिंह यांना तिकीट दिले आहे.