नवी दिल्ली: ईडीने पाठवलेल्या समन्सला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उच्च न्यायालयात याचिका करत ईडीने पाठवलेले समन्स हे बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आजपर्यंत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याप्रकरणी 9 समन्स पाठवले आहेत. पण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मुख्यमंत्री केजरीवाल ईडीसमोर हजर झाले नाहीत. आता समन्सबाबत राजकीय लढाई सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षाने पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीच्या समन्सवर हजर न राहिल्याबद्दल निशाणा साधला. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, केजरीवाल समन्सच्या नावाखाली धमकावत आहेत.
संबित पात्रा म्हणाले की, जामीन हा दिलासा मानण्याचा प्रयत्न करू नका. नऊ समन्सच्या विरोधात 18 सबबी वापरल्या आहेत. रात्रंदिवस पत्रकार परिषदा घेणारे समन्सपासून पळ काढत आहेत. मात्र, त्याचवेळी सीएम केजरीवाल यांनी ईडीचे समन्स बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.