बीजिंग: बाळाला नऊ महिने उदरात बाळगणाऱ्या, प्रसूतीच्या अनंत यातना सहन करणाऱ्या आईचे माहात्म्य त्यामुळेच मोठे असते. या पार्श्वभूमीवर पुरुषानेही कधी तरी महिलांसारखा बाळंतपणाचा त्रास भोगून पाहायला हवा, असे म्हटले जाते. प्रत्यक्षात चीनमध्ये एका तरुणीने आपल्या प्रियकराला बाळंतपणाच्या त्रासाचा अनुभव देण्यासाठी चक्क त्याला तब्बल ३ तास विजेचे शॉक देऊन कहर केला. त्यामुळे त्याच्या आतड्यांवर तातडीची शस्त्रक्रिया करावी लागली.
‘चायना टाइम्स’ च्या वृत्तानुसार मध्य चीनमधील हेनान प्रांतातील सदर तरुणीने सांगितले की, तिच्या नातेवाईकांनी तिला लग्न होण्यापूर्वी प्रियकराला प्रसूतीच्या कळांचा अनुभव देण्याचा सल्ला दिला होता. प्रियकराने सुरुवातीला आढेवेढे घेतले; परंतु इच्छा नसताना तो सहमत झाला. हे जोडपे एका केंद्रात गेले जिथे एखाद्याला इलेक्ट्रोड लावता येतात. इलेक्ट्रोडच्या माध्यमातून शॉक दिल्याने स्नायू आकुंचन पावून मासिक पाळी आणि बाळंतपणासारख्या वेदना होऊ शकतात.
आईने केले मुलाचे लग्न रद्द
तरुणाच्या आईला जेव्हा ही बाब कळाली तेव्हा तिने रागाच्या भरात झालेला साखरपुडा आणि नंतरचे लग्न रद्द केले. आईने प्रेयसीला मुलाला भेटण्यास येण्यास मनाई केली आणि तिच्यावर खटला भरण्याची धमकी दिली.
प्रियकराला मरण यातना…
प्रियकराला शॉक देण्यास सुरुवात झाल्यानंतर पहिल्या ९० मिनिटांत तो आठव्या पातळीच्या विजेच्या धक्क्यांमुळे सारखा ओरडत होता. दहाव्या आणि बाराव्या पातळीच्या शॉकमुळे वेदना असह्य होऊन तो शिव्याशाप देऊ लागला, धाय मोकलून रडू लागला. तो जोरजोरात श्वास घेत होता, घामाने त्याचे कपडे भिजले होते. बाराव्या पातळीचे धक्के त्याला ९० मिनिटे सहन करावे लागले. तीन तास झाल्यानंतर तो बेशुद्ध पडला. त्याचे पोट एखाद्या लाकडी फळीसारखे कडक झाले होते. घरी आल्यावर रात्री त्या तरुणाला उलट्या, पोटदुखी सुरू झाली. तरुणाने हा त्रास अंगावर काढला. एका आठवड्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. त्याचे लहान आतडे तातडीच्या शस्त्रक्रियेने काढून टाकावे लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर तरुणावर शस्त्रक्रिया करण्यात आली.