वाराणसी: अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करणारे पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचे निधन झाले आहे. लक्ष्मीकांत दीक्षित अनेक दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त होते. वयाच्या ८६ व्या वर्षी वाराणसीमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित यांची अंतिम यात्रा त्यांच्या मंगलागौरी या निवासस्थानापासून सुरू होणार आहे.
लक्ष्मीकांत दीक्षित हे वाराणसीच्या मीरघाट येथे असलेल्या सांगवेद महाविद्यालयाचे वरिष्ठ आचार्य होते. या विद्यापीठाची स्थापना काशी नरेश यांच्या सहकार्याने झाली. आचार्य लक्ष्मीकांत यांची काशीतील यजुर्वेदाच्या महान विद्वानांमध्ये गणना होते.
महाराष्ट्रातून आले आणि काशीत स्थायिक झाले
एवढेच नाही तर लक्ष्मीकांत दीक्षित हे पूजेच्या पद्धतीतही पारंगत मानले जात होते. लक्ष्मीकांत दीक्षित यांनी त्यांचे काका गणेश दीक्षित भट्ट यांच्याकडून वेद आणि विधींची दीक्षा घेतली. मूळचे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील जेऊर येथील लक्ष्मीकांत दीक्षित यांचे कुटुंब अनेक पिढ्यांपूर्वी काशी येथे स्थायिक झाले होते. त्यांच्या पूर्वजांनी नागपूर व नाशिक या संस्थानांतही धार्मिक विधी केले. लक्ष्मीकांत यांचा मुलगा सुनील दीक्षित यांनी यापूर्वी सांगितले की, त्यांचे पूर्वज पंडित गागा भट्ट यांनी १७ व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला होता.
दरम्यान 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. रामललाचा अभिषेक 121 पुजाऱ्यांच्या पथकाने पार पाडला. काशीचे विद्वान लक्ष्मीकांत दीक्षित हे त्या पथकाचे मुख्य पुजारी होते. 16 जानेवारीपासूनच प्राणप्रतिष्ठेचा विधी सुरू झाला असला, तरी मंगल विधी 22 जानेवारीला पार पडला. अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रमुख यजमान म्हणून उपस्थित होते. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांची भेट घेतली.