नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली. एका वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई (CJI Bhushan Gavai) यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने कोर्ट परिसरात काही काळ गोंधळ उडाला होता.

सरन्यायाधीश गवई यांच्या खंडपीठासमोर कामकाजाच्या पहिल्या सत्रात सुनावणी सुरू असताना, राकेश किशोर नावाच्या वकिलाने खंडपीठाच्या दिशेने धाव घेत, ‘सनातन धर्म का अपमान नही सहेगा हिंदूस्तान’ अशा घोषणा देत सरन्यायाधीशांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले आणि बाहेर नेण्यात आले. यानंतर पुन्हा कामकाजाला सुरुवात करण्यात आली.

हल्ला का करण्यात आला?
काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीशांनी खजुराहो येथील एका पुरातन मंदिरातील भगवान विष्णूच्या मूर्तीच्या पुनर्स्थापनेबाबतच्या याचिकेवर सुनावणी करताना एक टिप्पणी केली होती. ती याचिका फेटाळताना ते म्हणाले होते की, “जा आणि देवालाच काहीतरी करण्यासाठी सांगा. तुम्ही भगवान विष्णूचे कट्टर भक्त असल्याचे सांगता, मग आता जा आणि प्रार्थना करा.”
या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता आणि सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया येत होत्या. त्यानंतर सरन्यायाधीशांनी ‘मी सर्व धर्मांचा सन्मान करतो’ असे स्पष्टीकरणही दिले होते. सरन्यायाधीश गवईंनी केलेल्या याच टिप्पणीमुळे वकिलाने संताप व्यक्त करत हा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
हा प्रकार घडत असताना सरन्यायाधीश गवई शांत होते. हल्ला करणाऱ्या वकिलाला कोर्टातून बाहेर नेल्यानंतर त्यांनी इतर वकिलांना, ‘या सगळ्यावर लक्ष देऊ नका. आम्हाला फरक पडत नाही. या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही.’ असं सांगत कामकाज पुन्हा सुरू केले.
दरम्यान, घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोर्ट परिसरातील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.







