पाकिस्तान : पाकिस्तानमधून मोठ्या स्फोटाची बातमी समोर येत आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा रेल्वे स्थानकावर शनिवारी मोठा बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात २१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३० पेक्षा अधिक जण जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बॉम्बस्फोटावर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. बॉम्बशोधक पथक आणि स्थानिक पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून या स्फोटाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्फोट रेल्वे स्टेशनवरील बुकिंग कार्यालयात झाला. ट्रेन प्लॅटफॉर्मवर पोहचण्यापूर्वी हा स्फोट झाला. या हल्ल्याची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मीकडून घेण्यात आली आहे. रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, जाफर एक्स्प्रेस सकाळी ९ वाजता पेशावरसाठी रवाना होणार होती. स्टेशनवर मोठी गर्दी होती त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
ही घटना आत्मघाती हल्लासारखी वाटत असून या स्फोटामध्ये जखमी झालेल्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आले आहे. घटनास्थळावर युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. पोलिसांकडून या स्फोटाचा तपास सुरू आहे. दावा केला जात आहे की, क्वेटामध्ये एकापाठोपाठ एक स्फोट झाले आहेत. पहिल्या स्फोटामध्ये चार लोकांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या स्फोटामध्ये १५ ते २६ जणांच मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर येत आहे.
पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागात दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून याशिवाय येथे फुटीरतावादी बंडखोरीही वाढत आहे. पाकिस्तानचे अध्यक्ष सय्यद युसूफ रझा गिलानी यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी सांगितले की, ‘दहशतवादी हे मानवतेचे शत्रू आहेत. त्यांनी निरपराध लोकांना लक्ष्य केले आहे.’ यावेळी त्यांनी दहशतवाद संपवण्यासाठी शक्य ते सर्व पावले उचलण्याच्या आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार केला.