नवी दिल्ली: चंदीगड महापौर निवडणुकीवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ऐतिहासिक निकाल दिला. महापौर निवडणुकीत अवैध घोषित करण्यात आलेल्या 8 मतपत्रिका वैध मानल्या जातील, असा आदेश सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाने दिला आहे. त्यानंतर आम आदमी पक्षाचे कुलदीप कुमार यांना महापौर म्हणून विजयी घोषित करण्यात आले.
आज सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी त्यांचे सहकारी जज जस्टिस मनोज मिश्रा आणि जेबी पारदीवाला यांच्यासोबत बाद करण्यात आलेले बॅलेट पेपर चेक केले होते. रिटर्निंग ऑफिसरने बाद ठरवलेल्या त्या आठही मतपत्रिका वैध असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. याप्रकरणात रिटर्निंग ऑफिसर पूर्णपणे दोषी आहेत. मतपत्रिका खराब झालेल्या नव्हत्या. त्या व्यवस्थितरित्या फोल्ड केलेल्या होत्या, त्यावर रबर स्टँपही होता. यावरून मसीह यांची भूमिका दुहेरी असून चुकीची आहे. मसीह यांनी निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीररित्या राबवली आणि न्यायालयासमोर खोटं बोलले. त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई केली पाहिजे. मसीह यांनी जो निर्णय दिला होता, तो बेकायदेशीर होता, असंही कोर्टाने म्हटलं आहे.
नव्याने निवडणुका घेण्याची मागणी कोर्टात सादर करण्यात आलेल्या याचिकेतून करण्यात आली होती. त्याशिवाय इतर दिलासा देण्याची मागणीही करण्यात आली होती. त्यावरही कोर्टाने भाष्य केलं. निवडणूक रद्द केली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. पण अनिल मसीहने जे काही केलंय ते लोकशाही नियमांच्याविरुद्ध आहे. त्यामुळे अनुच्छेद 142 अन्वये संपूर्ण न्याय देणं आमची जबाबदारी आहे. याचिकाकर्त्याला 12 मते मिळाल्याचे खंडपीठाने सांगितले. आठ मते चुकीच्या पद्धतीने अवैध ठरविण्यात आली. याचिकाकर्त्याच्या बाजूने ही आठ मते पडली आहेत. जर बाद ठरवलेली आठ मते त्यात जोडली तर आपच्या उमेदवाराची 20 मते होतात. त्यामुळे पार पडलेली निवडणूक कायम ठेवणं हाच न्याय आहे. आणि म्हणूनच आपचे उमेदवार कुलदीप कुमार हे विजयी ठरत आहेत, असं कोर्टाने म्हटलं आहे.
दरम्यान, मसीह यांनी सोमवारी कोर्टासमोर आपला गुन्हा कबूल केला होता. आपणच मतपत्रिकेवर क्रॉस केलं होतं असं त्याने म्हटलं. त्यानंतर कोर्टाने या प्रकरणाशी संबंधित सर्व दस्ताऐवज आणि व्हिडीओ, ऑडिओ रेकॉर्डिंग मागवूं घेतल्या होत्या. व्हिडीओ आणि बॅलेट पेपर कोर्ट रूममध्ये जमा करण्यात आले होते.
चंदीगडचे महापौर झालेले आपचे नेते कुलदीप कुमार म्हणाले की, मला सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानायचे आहेत. हा चंदीगडच्या जनतेचा आणि इंडिया आघाडीचा विजय आहे. भाजप अजिंक्य नाही हे यावरून दिसून येते आणि आम्ही एकजूट राहिलो तर त्यांचा पराभव करू शकतो.
सत्याचा विजय झाला – मान
पंजाबचे सीएम भगवंत मान यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला. मान म्हणाले की, अखेर सत्याचा विजय झाला. चंदीगडमधील महापौर निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. पीठासीन अधिकाऱ्याने फेटाळलेल्या 8 मते कोर्टानी वैध ठरवली आणि आपचे कुलदीप कुमार यांना महापौर केले. लोकशाहीच्या या महान विजयाबद्दल चंदीगडच्या जनतेचे खूप खूप अभिनंदन.
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी देखील सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. चंदीगड काँग्रेसनेही न्यायालयाच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. या निर्णयाचे वर्णन ऐतिहासिक आणि लोकशाही वाचवणारे आहे, असे केले.