रांची: सीएम हेमंत सोरेन यांना ईडीच्या पथकाने सात तासांच्या चौकशीनंतर अटक केली आहे. आता झारखंडचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना चंपाई सोरेन यांच्या बाजूने पाठिंबा देणारे पत्र सादर केले आहे. याचा अर्थ आता हेमंत सोरेन यांच्या जागी चंपाई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री होऊ शकतात.
याबाबत अधिक माहिती देताना झामुमोचे नेते राजेश ठाकूर म्हणाले की, चंपाई सोरेन यांच्या नावावर एकमत झाले आहे. सत्ताधारी पक्षाच्या सर्व आमदारांनी चंपाई सोरेन यांची नेतेपदी निवड केली आहे. याबाबत बन्ना गुप्ता म्हणाले की, आम्ही चंपाई सोरेन यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आहे. हेमंत सोरेनच्या अटकेनंतर सीएम निवास, राजभवन, भाजप कार्यालयासह रांचीच्या विविध भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ईडीच्या टीमने हेमंत सोरेन यांची सीएम हाऊसमध्ये सुमारे 7 तास चौकशी केली. यानंतर ईडीच्या टीमने दुपारी एकच्या सुमारास हेमंत सोरेन यांना अटक केली आणि त्यांना सोबत घेऊन गेले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या चौकशीत हेमंत सोरेन यांच्या उत्तरांवर ईडीचे अधिकारी समाधानी झाले नाहीत. हेमंत सोरेन यांनी आतापर्यंतच्या चौकशीत फक्त होय आणि नाही असे उत्तर दिले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी हेमंत सोरेन यांना ४० हून अधिक प्रश्न विचारले आहेत. अनेक प्रश्न ऐकून हेमंत सोरेन ईडीच्या अधिकाऱ्यांवर संतापले. दरम्यान, रांचीच्या अनेक भागात कलम 144 लागू आहे. सीएम हाऊसबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.