नवी दिल्ली: पंजाब आणि नोएडामधील शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेण्यासाठी सरकार त्यांच्या मागण्यांवर विचार करण्यास तयार आहे. पंजाबमधील आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री चंदीगडला जाणार आहेत. केंद्र सरकारच्या वतीने पीयूष गोयल, अर्जुन मुंडा आणि नित्यानंद राय चंदीगडला जाणार आहेत. आज संध्याकाळी उशिरा तिन्ही केंद्रीय मंत्री शेतकऱ्यांशी चर्चा करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासाठी हे सर्वजण चंदीगडला रवाना झाले आहेत. पंजाबसह देशातील शेतकरी संघटना 13 फेब्रुवारीला दिल्ली गाठून आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ जंतरमंतरवर आंदोलन करण्याचा विचार करत आहेत.
13 फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास शेतकरी दिल्लीला रवाना होणार असल्याचे संघटनांनी सांगितले. 13 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे शेतकरी आंदोलनासाठी निघणार आहेत. नोएडा आणि ग्रेटर नोएडा येथील शेतकऱ्यांनी केलेल्या व्यापक निषेधाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर प्रचंड वाहतूक कोंडी दिसून आली. त्यामुळे या भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. संसदेला घेराव घालण्यासाठी शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघाले असताना सरिता विहारमध्ये अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने वाहतूक कोंडीत अडकल्याने रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
शेतकरी नेते आपल्या मागण्यांवर ठाम
शेतकरी नेते शरवन पंढेर यांनी सांगितले की, तीन केंद्रीय मंत्री चर्चेसाठी येत आहेत. ज्यामध्ये पीयूष गोयल, अर्जुन मुंडा, कृषी मंत्री आणि गृह राज्यमंत्री यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ही बैठक चंदीगडच्या सेक्टर 26 मध्ये होणार आहे. पंढेर म्हणाले की, आम्ही आमच्या मागण्या आधीच मांडल्या आहेत. त्या मागण्यांसह एकूण 10 मुद्यांवर चर्चा करणार आहोत.