पुणे : देशातील जनगणनेबाबत मोठी माहिती समोर येत आहे. गेल्या चार वर्षापासून लांबणीवर पडलेली जनगणना पुढील वर्षापासून सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे. आता जनगणना 2025 पासून सुरु होऊन 2026 पर्यंच सुरु राहणार आहे. 2021 मध्ये जनगणना होणार होती. परंतु, कोविड महामारीमुळे जनगणना पुढे ढकलण्यात आली आहे.
पुढच्या वर्षापासून देशात जनगणना केली जाणार असून आता जनगणनेचे काहीसे चक्रही बदलणार आहे. आत्तापर्यंत 1991, 2001, 2011 इत्यादी दशकाच्या सुरुवातीला दर दहा वर्षांनी जनगणना केली जात होती. पण, आता 2025 नंतर पुढील जनगणना 2035, 2045, 2055 अशी केली जाणार आहे. जनगणना पूर्ण झाल्यानंतर लोकसभेच्या जागांचं सीमांकन सुरू होईल, 2028 पर्यंत सीमांकन प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
2021 मध्ये होणारी जनगणना आता 2025 मध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. मात्र, जनगणना सुरु करण्याची तारीख अद्याप ठरलेली नसून, रजिस्ट्रार जनरलची तयारी सुरु आहे. जनगणनेला किमान 2 वर्षे लागतील, असे मानले जात आहे. जनगणनेबाबत काही धोरणात्मक निर्णयही शासनस्तरावर घ्यावे लागणार आहेत.
दरम्यान, अनेक विरोधी पक्षांकडून जात जनगणनेची मागणीही केली जात आहे, मात्र सरकारने अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही. जनगणनेत धर्म आणि वर्ग विचारले जातात. सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि जमातीची गणना केली जाते. यावेळी लोकांना ते कोणत्या पंथाचे अनुयायी आहेत, हे देखील विचारलं जाऊ शकतं.