जयपूर : राजस्थानमधील जयपूर येथील सर्वात मोठ्या एसएमएस रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील सवाई मानसिंग रुग्णालयात डॉक्टरांना एका रुग्णाच्या पोटाची तपासणी करताना मोबाईल सापडला आहे. हा मोबाईल की पॅड असलेला होता. त्यानंतर डॉक्टरांनी प्रक्रियेद्वारे रुग्णाच्या पोटातून मोबाईल बाहेर काढला. हा रुग्ण अंडरट्रायल होता. मोबाईल त्याच्या पोटात कसा गेला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या रुग्णाच्या पोटातून मोबाईल काढण्यात आला तो रुग्ण जयपूर तुरुंगात होता.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नुकतेच कारागृहातील एका अंडरट्रायल कैद्याला शुक्रवारी एसएमएस रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होत. त्यानंतर शस्त्रक्रिया विभागाच्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता रुग्णाच्या पोटात मोबाईल असल्याचे समोर आले. त्यानंतर आज शस्त्रक्रिया विभागातील डॉक्टर शालू गुप्ता यांनी एन्डोस्कोपीद्वारे तोंडातून मोबाईल बाहेर काढला. सध्या कैद्याची प्रकृती ठीक असल्याची प्राथमिक माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
त्या रुग्णाला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून मोबाईल फोन हा कैद्याच्या पोटात कसा गेला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र मोबाईल फोन कैद्याने गिळला असावा, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. साधारणपणे कारागृहात मोबाईल तपासले जातात. अशा परिस्थितीत कैदी अनेकदा मोबाईल लपवण्यासाठी अशा प्रकारचे कृत्य करतात.