भुवनेश्वर: केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ओडिशातील भुवनेश्वर येथे अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) उपसंचालक चिंतन रघुवंशी यांना लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. चिंतन रघुवंशी यांच्यावर एका व्यावसायिकाकडून २० लाख रुपये घेतल्याचा आणि ५ कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. सीबीआय अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि .३०) ही माहिती दिली.

नेमकं प्रकरण काय?
ईडीचे उपसंचालक चिंतन रघुवंशी यांनी ढेंकनाल येथील दगड खाण व्यावसायिक रतिकांत राऊत यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात दिलासा मिळवण्यासाठी ५ कोटी रुपयांची मागणी केली होती. सीबीआय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एजन्सीला माहिती मिळाली होती की, रघुवंशी हे लाचेचा पहिला हप्ता घेणार आहेत. यानंतर, एजन्सीने गुरुवारी (दि.२९) सापळा रचला आणि त्यांना रंगेहाथ पकडले.
एफआयआरमध्ये काय म्हटले?
सीबीआयच्या एफआयआरनुसार, राऊत यांना या वर्षी मार्चमध्ये ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, रघुवंशी यांनी तक्रारदार राऊत यांना त्यांच्या चेंबरमध्ये बोलावले. त्यानंतर कथित प्रकरणात दिलासा मिळवण्यासाठी राऊत यांना भगती नावाच्या व्यक्तीला भेटण्यास सांगितले. जेव्हा राऊत यांनी एवढी मोठी रक्कम देण्यास असमर्थता दर्शविली. तेव्हा भगती यांनी राऊत याचन्हे रघुवंशी यांच्याशी बोलणे करून दिले. त्यानंतर लाचेची रक्कम २ कोटी रुपये एवढी ठरवली.
कोण आहेत चिंतन रघुवंशी ?
चिंतन रघुवंशी हे 2013 च्या बॅचचे भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी आहेत. त्यांना लाचेच्या आरोपाखाली रघुवंशी यांना सीबीआयने अटक केली आहे. या प्रकरणी त्याची चौकशी सुरू आहे.







