पुणे: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आता त्यांच्या अडचणी आणखीनच वाढल्या असून त्यांचे पुत्र करण मानकर आणि व्याही सुखेन शहा यांच्यावरही गुन्हे दाखल झाले आहेत. समर्थ पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे दाखल झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, शंतनू कुकडे नावाच्या व्यक्तीच्या बँक खात्यातील संशयास्पद व्यवहारामुळे हे प्रकरण उघडकीस आले. त्यांच्या बँक खात्यातून मानकर पिता-पुत्रांच्या खात्यात सुमारे पावणेदोन कोटी रुपये वर्ग झाले होते. तसेच, करण मानकर यांचे सासरे सुखेन शहा यांच्या खात्यात तब्बल 6 कोटी ५२ लाख रुपये वर्ग झाले आहेत. या व्यवहारांबाबत पोलिसांनी मानकर यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी त्यांनी कुकडेसोबत जमीन खरेदीचा कोणताही व्यवहार झाला नसल्याचे सांगितले. त्यांनी काही कागदपत्रे सादर केली, पण ती बनावट असल्याचे पोलिसांना आढळून आले. या संदर्भात पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार दोन गुन्हे दाखल झाले आहेत. एका गुन्ह्यात शंतनू सॅम्युअल कुकडे, सुखेन सुरेशचंद्र शहा, रौनक भरत जैन आणि इतर काही जणांचा समावेश आहे.






