चंदीगड: पत्नीने आपल्या पतीला हिजडा म्हणून हिणवणे हे एक प्रकारे मानसिक क्रौर्यच आहे, असे निरीक्षण पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने घटस्फोटाच्या एका प्रकरणाच्या निकालावेळी नोंदवले. यासोबतच न्यायालयाने घटस्फोटाच्या खटल्यात पतीच्या बाजूने निकाल देत कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.
या प्रकरणात कौटुंबिक न्यायालयाने १२ जुलै रोजी निकाल देत पतीची घटस्फोटाची मागणी मंजूर केली होती. याविरोधात पत्नीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायमूर्ती सुधीर सिंग आणि न्यायमूर्ती जसजीत सिंग बेदी यांच्या खंडपीठाने याप्रकरणी आलेली स्थिती आणि अशा प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निकाल विचारात घेतले असता याचिकाकर्त्या महिलेने आपल्या पतीसोबत केलेले कृत्य क्रौर्यासमान असल्याचे नमूद केले. आपल्या पतीला हिजडा म्हणून उपमर्द करणे आणि सासूला तू हिजड्याला जन्म दिला आहे, असे हिणवणे हे क्रौर्यच आहे, असे खंडपीठ म्हणाले. यासोबत खंडपीठाने कौटुंबिक न्यायालयाने पतीच्या बाजूने घटस्फोटाचा दिलेला निकाल कायम ठेवला.
या दाम्पत्याचा २०१७ साली विवाह झाला होता. मात्र गेल्या सहा वर्षांपासून ते विभक्त राहत होते. पतीने याचिकेत आपल्या पत्नीला पॉर्न फिल्म (अश्लील चित्रपट) पाहण्याची सवय असल्याचा दावा केला होता. पत्नी रात्री उशिरापर्यंत जागते, दररोज तीन वेळा शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी ती करते. प्रत्येक संबंध किमान १५ मिनिटांचा असायला हवा, असा तिचा दबाव असतो. ती मला नेहमी नपुंसक असल्याचे हिणवत होती. तसेच तिची दुसऱ्याशी लग्न करण्याची इच्छा होती, असे आरोप पतीने केले होते.
तर सासरकडील लोकांनी आपल्याला घराबाहेर काढल्याचा दावा महिलेने केला होता. सासरी मला नशेच्या गोळ्या देत होते. बेशुद्ध झाल्यानंतर तांत्रिकाने दिलेला ताविज माझ्या गळ्यात बांधण्यात आला. तसेच मला वश करण्यासाठी मंतरलेले पाणी पाजले जायचे, असे आरोप पत्नीने केले होते, न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या, त्याचवेळी हे दाम्पत्य सहा वर्षांपासून विभक्त राहत असल्याने त्यांचे नाते पुन्हा पूर्ववत करणे अशक्य असल्याचे नमूद केले.