पुणे : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सराफा बाजारात पुन्हा एकदा दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती वाढल्या आहेत. सोन्याच्या दरात प्रति तोळा 1,750 रुपयांची वाढ झाल्याने 10 ग्रॅम सोन्याचा भाव आता 1,26,550 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या किमतीतही वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या बाजारात कधी वाढ तर कधी घसरण असे चित्र दिसत आहे. मात्र, सध्याच्या दरवाढीमुळे लग्नासाठी दागिने घेणाऱ्या कुटुंबांचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. चांदीचा 100 ग्रॅमचा दर 500 रुपयांनी वाढून 17,000 रुपयांवर गेला आहे.
किती आहे आजचा सोन्याचा भाव?

24 कॅरेट शुद्ध सोन्याचा 1 ग्रॅमचा दर 12,655 रुपये, तर 8 ग्रॅमसाठी 1,01,240 रुपये मोजावे लागतील. दागिन्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या 22 कॅरेट सोन्याचा 1 ग्रॅमचा दर 11,600 रुपये आहे. 18 कॅरेट सोन्याचा विचार केल्यास 1 ग्रॅमसाठी 9,491 रुपये, 8 ग्रॅमसाठी 75,928 रुपये आणि 10 ग्रॅमसाठी 94,910 रुपये दर आहे.
आता आगामी काळात बाजारात दरांची दिशा काय राहणार, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. दर वाढत राहिल्यास लग्नसराईतील खरेदीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.






