नवी दिल्ली : लोकसभेकडून राजकीय पक्षांना कार्यालयाचे वाटप करण्यात आले असून अजित पवार यांच्या पक्षाला कार्यालय मिळाले नसल्याची माहिती समोर येत आहे. सोशल मीडियावर याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. शरद पवार यांच्या पक्षाला संसदेतील पक्ष कार्यालय देण्यात आले आहे. बुधवारी शरद पवार यांच्या पक्षाला कार्यालय देण्यात आले नव्हते, पण आज लोकसभा सचिवालयाकडून परिपत्रक काढत कार्यालय दिल्याचं सांगण्यात आले आहे.
अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्यानंतर अजित पवार यांनी आमदारांच्या संख्याबळानुसार पक्ष आणि चिन्हावर दावा ठोकला होता. निवडणूक आयोगाकडून त्यांना पक्ष आणि कार्यालय सुद्धा मिळाले होते. परंतु लोकसभेमध्ये त्यांना सपाटून मार खावा लागला. त्यांच्या पक्षाचा फक्त एकच खासदार निवडून आला आहे. परिणामी त्यांना संसदेत पक्ष कार्यालय मिळालेच नाही. उलट शरद पवार यांना नवे चिन्ह आणि पक्षाचं नाव देण्यात आले. त्यांना मात्र लोकसभेमध्ये ८ जागांवर दणदणीत विजय मिळाला. शरद पवार यांच्या पक्षाला संसदेत पक्ष कार्यालय देण्यात आले आहे.
अजित पवारांच्या पक्षाला कार्यालयच नाही..
खासदारांच्या संख्येनुसार संसदेतील पक्ष कार्यालय शरद पवार यांच्याकडेच सोपण्यात आले आहे. लोकसभा सचिवालयाने नवीन पत्रक काढले. त्यामध्ये अजित पवारांना धक्का देण्यात आला आहे. नव्या पत्रकात NCP Shardchandra Pawar Party असा उल्लेख करण्यात आला आहे तर दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षाला मात्र कार्यालय देण्यात आले नाही.
एकनाथ शिंदेंनाही हादरा..
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळवले होते. मात्र, लोकसभा संसदेतील पक्ष कार्यालयात त्यांच्या पक्षाच्या नावापुढे शिंदे असा उल्लेख कऱण्यात आला आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा “शिवसेना (शिंदे)” असा उल्लेख करण्यात आला असून एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्ष देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्यानंतर पक्षाचा उल्लेख फक्त ‘शिवसेना’ म्हणून केला जावा यासाठी शिंदे गटाचे नेते आग्रही असल्याचे दिसतात. त्यात आता लोकसभा सचिवालयाकडूनच पक्षाचा उल्लेख ‘शिवसेना (शिंदे)’ असा करण्यात आला आहे. शिंदेंच्या शिवसेनेला जुन्या संसद भवनात १२८ क्रमांकाचे दालन तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला १२८ A हे दालन मिळाले आहे.