नवी दिल्ली: बहुजन समाज पक्षाने (BSP) आपले खासदार दानिश अली यांना पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतल्यामुळे निलंबित केले. संसदेत दानिश अली ज्या पद्धतीने काँग्रेससोबत उभे राहिले होते, तेच या कारवाईचे सर्वात मोठे कारण बनल्याचे समोर येत आहे.
बसपाने दानिश अली यांना अनेक वेळा सूचना दिल्या होत्या आणि त्यांच्या मुद्द्यावर पक्ष त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले होते. तरीही दानिश अली सतत काँग्रेससोबत उभे असल्याचे दिसले आणि काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी उभा राहिला. त्यांना काढून टाकण्याचे हे सर्वात मोठे कारण असल्याचे बोलले जात आहे.
राहुल गांधी यांनी दानिश अली यांची भेट घेतली होती. भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी बसपा खासदार दानिश अली यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राजकारण चांगलेच तापले होते. बिधुरी यांच्या वक्तव्यावर चौफेर टीका होत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी सप्टेंबरमध्ये दानिश अली यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि खासदार इम्रान प्रतापगढ़ीही होते.