नवी दिल्ली: मद्य घोटाळा प्रकरणी तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची कन्या के. कविता यांना दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कविता या आधीच तिहार तुरुंगात बंद आहेत. या संपूर्ण कटात बीआरएस नेत्या कविता हा महत्त्वाचा भाग असल्याचे सीबीआयचे मत आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी त्यांनी न्यायालयाकडे पाच दिवसांची कोठडी मागितली होती.
कोर्टात आपला युक्तिवाद सादर करताना, सीबीआयने सांगितले की, दिल्ली दारू घोटाळ्यात आम आदमी पार्टीला (आप) 100 कोटी रुपयांची लाच देण्याची व्यवस्था करण्यात के. कविता यांचा मोठा वाटा आहे. एका मोठ्या व्यावसायिकाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आणि केजरीवाल यांनी त्यांना दारू धोरणाद्वारे पाठिंबा देण्याचे सांगितले.
सीबीआयने सांगितले की, बीआरएस नेत्या कविता यांनी सरथचंद्र रेड्डी यांना दारू धोरणावर चर्चेसाठी पुढे केले होते. अभिषेक बोईनपल्ली यांनी विजय नायरला १०० कोटी रुपये दिल्याचे सांगितले होते, असे वक्तव्य दिनेश अरोरा यांनी केले आहे. सीबीआयने आपल्या युक्तिवादाच्या समर्थनार्थ सरकारी साक्षीदार दिनेश अरोरा यांच्या वक्तव्याचा हवाला दिला.
सीबीआयने कविताल यांना ताब्यात घेण्यासाठी केलेल्या याचिकेत म्हटलेकी, हॉटेल ताजमध्ये अनेक आरोपींसोबत दारू धोरणाबाबत बैठक झाली होती. दिल्ली मद्य धोरण मार्च ते मे 2021 पर्यंत बनवले जात होते. त्यानंतर अरुण पिल्लई, बुची बाबू, बोईनपल्लीच दिल्लीतील हॉटेल ताजमध्ये थांबले होते. सीबीआयचा दावा आहे की, के. कविता यांनी हैदराबादमधील एका व्यावसायिकासोबत करार केला होता. विजय नायर हा कविता यांच्या संपर्कात होते. कविता यांनी व्यावसायिकाला 100 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम देण्यास सांगितले होते, असंही सीबीआयने म्हटले आहे.