नवी दिल्ली : तुटलेली नाती, प्रेमसंबंध हे भावनिकदृष्ट्या त्रासदायक असतात; परंतु म्हणून नातेसंबंध तोडणे हा काही गुन्हा ठरत नाही आणि या आधारावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे म्हणता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी एका खटल्याच्या सुनावणीवेळी स्पष्ट केले.
कमरुद्दीन दस्तगीर सनादी नामक याचिकाकर्त्याच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती पंकज मित्तल आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुइया यांच्या खंडपीठाने कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला. हायकोर्टाने कमरुद्दीनला एका युवतीची फसवणूक आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरविले होते. मात्र, हे प्रकरण तुटलेल्या नातेसंबंधांचे असून, यामध्ये गुन्हेगारी कृत्याचा समावेश नाही, असे खंडपीठाने नमूद केले. ऑगस्ट २००७ मधील हे प्रकरण आहे. एका महिलेने तिच्या २१ वर्षीय मुलीच्या आत्महत्येसाठी कमरुद्दीनवर आरोप करत तक्रार दाखल केली होती. आपली मुलगी आणि कमरुद्दीनचे ८ वर्षे प्रेमसंबंध होते. मात्र, कमरुद्दीनने लग्नास नकार दिल्याने तिने आत्महत्या केली, असा महिलेचा आरोप होता.
या प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार कमरुद्दीनविरोधात भादंवि कलम ४१७ (फसवणूक), कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि कलम ३७६ (बलात्कार) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. कनिष्ठ न्यायालयाने या तीनही गुन्ह्यांमधून आरोपीची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने फसवणूक व आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याखाली आरोपीला दोषी ठरवून पाच वर्षांचा कारावास आणि २५ हजार रुपये तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती.
या निर्णयाला कमरुद्दीनने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा आदेश रद्द करत आरोपीला दिलासा दिला. युवतीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या दोन चिठ्यांमध्ये आरोपीने आपल्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याचा तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा कोणताही आरोप केलेला नाही. त्यामुळे हे प्रकरण तुटलेल्या नातेसंबंधाचे असून, गुन्हेगारी कृत्याशी संबंधित नाही. तुटलेले नातेसंबंध हे भावनिकदृष्ट्या त्रासदायक असते; परंतु याचा अर्थ तो गुन्हा नाही. विद्यमान प्रकरणातही आरोपीने संबंधित युवतीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा कुठलाही पुरावा नाही, असे खंडपीठाने आपल्या १७ पानी आदेशात नमूद केले.