नवी दिल्ली : पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका म्हणजे २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधीची रंगीत तालीम मानली जात होती. ही निवडणूक भाजपने जिंकल्यामुळे पुन्हा एकदा ब्रँड मोदींचे यश अधोरेखित झाले आहे. मध्य प्रदेशमध्ये ऑपरेशन लोटस राबवत भाजपने मोठी मुसंडी मारली आहे. तर राजस्थान, छत्तीसगडमधील काँग्रेसची सत्ता घालवण्यात भाजपला यश आले आहे. तेलंगणाच्या राजकारणात केसीआर यांच्या बीआरएस आणि काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. पण यंदा भाजपने करिश्मा करुन दाखवला आहे. २०१८ मध्ये फक्त एक जागा जिंकणाऱ्या भाजपने या वेळी १० जागांवर आघाडी मिळवली आहे. भाजपसाठी ही लॉटरी असल्याचे मानले जात आहे.
प्रतिष्ठेच्या लढतीत भाजपची बाजी
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची ‘सेमीफायनल’ म्हणून मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांकडे पाहिले जात आहे. या निवडणुकीच्या निकालाचे प्रतिबिंब लोकसभेत उमटणार असल्याने काँग्रेस व भाजपसाठी ही प्रतिष्ठेची लढाई बनली होती. या लढाईमध्ये अखेर भाजपने बाजी मारली आहे. ऑपरेशन लोटस विजयी झाल्याने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजप अलर्ट मोडवर आला आहे.
राजस्थानात सत्ता परिवर्तनाची परंपरा अबाधित
राजस्थानमध्ये सत्ता परिवर्तनाची परंपरा अबाधित राहिली आहे. कारण विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजप पूर्ण बहुमताने पुन्हा एकदा सत्तेत येताना दिसत आहे. भाजपन या राज्यात कित्येक महिने आधीच तिकीट वाटप केले होते. त्याचा फायदा भाजपला झाला. राजस्थानात १९९ पैकी ११२ जागांवर भाजपला आघाडी आहे. त्यामुळे आता भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजस्थानचा मुख्यमंत्री म्हणून महंत बालकनाथ यांना पसंती मिळत आहे.
भाजपची मध्यप्रदेशात मोठी मुसंडी
भाजपने मध्य प्रदेशात सत्ता टिकवली आणि जागाही वाढवल्या. यामुळे पुन्हा एकदा ब्रँड मोदीचं यश अधोरेखित झालं. सर्व एक्झिट पोल खोटे ठरवत भाजपने मध्यप्रदेशात मोठी मुसंडी मारली आहे. राज्यात भाजप नंबर एकचा पक्ष ठरला असून, कलांमध्ये बहुमताचा आकडाही पार केला आहे. त्या मानाने मध्यप्रदेशातील काँग्रेसची कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची ठरली आहे. असे असले तरी आता मध्यप्रदेशचा मुख्यमंत्री कोण होणार, अशी चर्चा रंगली आहे. भाजप पुन्हा एकदा शिवराज सिंह चौहान यांच्या हातीच राज्याची सत्ता देणार की अन्य कुणाला मुख्यमंत्री करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाराज सिंह मुख्यमंत्री झाल्यास राज्यात ते पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कदाचित भाजप मध्यप्रदेशसाठी मोठा निर्णय घेऊ शकते, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्याने सर्वांच्या नजरा मध्यप्रदेशवर खिळल्या आहेत.
छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?
छत्तीसगडमध्ये सर्वच एक्झिट पोल्सनी छत्तीसगडमध्ये भाजपची सत्ता येईल असा अंदाज वर्तवला होता. निवडणूक निकालांच्या कलानुसार छत्तीसगडमध्ये भाजप सरकार स्थापन करताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
तेलंगणात भाजपला लॉटरी
तेलंगणाच्या राजकारणात केसीआर यांच्या बीआरएस आणि काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. पण यंदा भाजपने करिश्मा करुन दाखवला आहे. २०१८ मध्ये फक्त एक जागा जिंकणाऱ्या भाजपने यावेळी १० जागांवर आघाडी मिळवली आहे. त्यासोबतच भाजपच्या मतांचा टक्का १३.७६ झाला आहे. हे म्हणजे भाजपला लॉटरीच लागली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याचा भाजपला लोकसभेच्या निवडणुकांमध्ये फायदा होऊ शकतो. तेलंगणा येथे एकवरुन १० वर जाण्यासाठी निवडणुका जाहीर होण्याच्या काही दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक सभा घेतल्या. तसेच, मोदींनी येथे राष्ट्रीय हळद बोर्ट बनवण्याची घोषणा करत राज्यातील नागरिकांची कित्येक वर्षांची मागणी पूर्ण केली. त्याशिवाय भाजपने संपूर्ण निवडणूक प्रचारादरम्यान बीआरएस आणि काँग्रेस सरकारच्या अयशस्वी कामांचा पाढा वारंवार वाचला. इतकंच नाही तर भाजपने शेतकरी आणि महिलांच्या फायद्याच्या योजनांवरही लक्ष केंद्रित केलं.
तीन राज्यांमध्ये ब्रँड मोदींचे यश
हिंदी पट्ट्यातील तीन राज्यांमध्ये मोदींनी अनेक रॅली, रोड शो केले. भाजपनं निवडणूक प्रचार मोदींच्या अवतीभवती ठेवला. मध्य प्रदेशात ‘एमपी के मन में मोदी है’ आणि राजस्थानात ‘मोदी साथे अपनो राजस्थान’ अशा घोषणा दिल्या. तीन राज्यांमध्ये मोदींनी २ ते २७ नोव्हेंबर दरम्यान ४२ रॅली आणि ४ मोठे रोड शो केले. सर्वाधिक जोर मध्य प्रदेश, राजस्थानात लावण्यात आला. मध्य प्रदेशात मोदींनी १५ रॅली केल्या. इंदूरमध्ये मोठा रोड शो केला. राजस्थानात १५ रॅली केल्या. जयपूर आणि बिकानेरमध्ये रोड शो केले. तर छत्तीसगढमध्ये मोदींनी चार रॅली केल्या.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा कल या निकालात दडलेला असल्याचे मानले जात होते. आता कल स्पष्ट होत आहे. त्यामुळे या लढाईमध्ये अखेर भाजपने बाजी मारली आहे. ऑपरेशन लोटस विजयी झाल्याने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजप अलर्ट मोडवर आला आहे.