सुरत : सध्या देशात लोकसभा निवडणुकीमुळे सगळं वातावरण राजकारणमय झालं आहे. सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. अशातच देशात पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं असून दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी होणार आहे. ज्याचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. पण असं असतानाच निकाल जाहीर होण्याआधीच भाजपाला एका जागेवर विजय मिळाला आहे.
सुरतमधील भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली आहे. या जागेवर काँग्रेसचे उमेदवार निलेश कुम्भानी यांचा उमेदवारी अर्ज रद्दबातल ठरवण्यात आला आहे. प्रमुख विरोधी उमेदवाराचा उमेदवारी अर्जच बाद झाल्यामुळे दलाल यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता.
कुम्भानी यांचा अर्ज रद्दबातल झाल्यानंतर या जागेवर अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेल्या इतर आठ उमेदवारांनीही शेवटच्या दिवशी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. यानंतर भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांचा बिनविरोध विजयी झाले आहेत. दरम्यान, सुरतच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दलाल यांच्या विजयाची घोषणा केली असून त्यांना खासदारकीचं पत्रही देण्यात आले आहे.