मध्यप्रदेशमधील इंदोरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. भाजप युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष मोनू कल्याणे असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शहरातील एमजी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिमणबाग परिसरात आज रविवारी ही घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून पियुष आणि अर्जुनने मोनू कल्याणेवर गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या दोन्ही आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. इंदूर विधानसभा क्रमांक 03 च्या राजकारणात हस्तक्षेप करणारे मोनू कल्याणे हे कैलाश विजयवर्गीय यांचे पुत्र माजी आमदार आकाश विजयवर्गीय यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते.
नेमकं काय घडलं?
मोनू कल्याण हा शनिवारी रात्री भगवा यात्रेच्या तयारीत होता. दरम्यान, पियुष आणि अर्जुन नावाचे दोन युवक दुचाकीवरून चिमणबाग चौकात आले. दुचाकीवर बसून दोघेही मोनूशी काहीतरी चर्चा करू लागले. तेवढ्यात दुचाकीवर मागे बसलेल्या अर्जुनने पिस्तुल काढून मोनू कल्याणे यांच्यावर थेट गोळीबार केला आणि पियुषसह घटनास्थळावरून पळ काढला. एवढंच नाही तर चिमणाबाग चौकात असलेल्या मोनूच्या मित्रांवरही आरोपींनी गोळीबार केला, मात्र ते बचावले. दरम्यान, या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मोनूला त्याच्या मित्रांनी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.