नवी दिल्ली : ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यामुळे भाजपच्या उमेदवाराला मतदानासाठी बराच वेळ रांगेत उभे राहावे लागले. यावेळी भाजप आमदार आणि पीठासीन अधिकारी यांच्यात वाद झाला. त्यावेळी त्यांनी टेबलवरून ईव्हीएम ओढले आणि ते खाली पडून तुटले. ही घटना बेगुनिया विधानसभा मतदारसंघातील बोलागड ब्लॉकमधील कौनरीपटना येथील बूथ 114 वर शनिवारी घडली. याप्रकरणी पीठासीन अधिकाऱ्याने तक्रार दिली होती. त्यावरून भाजप उमेदवार प्रशांत जगदेव यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चिलकाचे भाजप आमदार प्रशांत जगदेव यांना यावेळी खुर्डा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. ओडिशामध्ये लोकसभेसोबतच विधानसभेच्याही निवडणुका होत आहेत. प्रशांत जगदेव आपल्या पत्नीसह बूथवर गेले होते, मात्र ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांना मतदानासाठी काही वेळ थांबावे लागले. त्याच्यात आणि पीठासीन अधिकारी यांच्यात वाद झाला. त्यावेळी त्याने टेबलवरून ईव्हीएम ओढले आणि ते खाली पडून तुटले.
पोलीस अधीक्षक अविनाश कुमार म्हणाले की, लोकप्रतिनिधी कायद्याव्यतिरिक्त, जगदेववर आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीठासीन अधिकाऱ्याने त्यांच्या तक्रारीत आमदाराने बूथवर गोंधळ निर्माण केल्याचा आरोप केला आहे. मतदान प्रक्रियेत व्यत्यय आणून मतदान कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले. आम्ही जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची विनंती केली आहे. न्यायालयाने प्रशांत जगदेवला न्यायालयीन कोठडी सुनावली असून सध्या ते खुर्द कारागृहात आहे.