नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार आणि उत्तर प्रदेशातील मुरादाबाद लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार कुंवर सर्वेश कुमार सिंह यांचे शनिवारी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मुरादाबादमध्ये शुक्रवारी (19 एप्रिल) मतदान पूर्ण झाले. मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या बारा उमेदवारांमध्ये कुंवर सर्वेश कुमार यांचा समावेश होता.
उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांनी पीटीआयला सांगितले की, “कुंवर सर्वेश कुमार सिंह यांचे निधन झाले आहे. त्यांच्या घशात काही समस्या होती आणि त्यांचे ऑपरेशन झाले होते, 19 एप्रिल रोजी ते एम्समध्ये तपासणीसाठी गेले होते आणि आज त्यांचे निधन झाले.
कुंवर सर्वेश यांना 2014 मध्ये भाजपने मुरादाबादमधून उमेदवारी दिली होती आणि त्यांनी निवडणूक जिंकली होती. परंतु, 2019 मध्ये त्यांचा समाजवादी पक्षाच्या (एसपी) डॉ. एस.टी. हसन यांनी पराभव केला होता. हसन हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोक दलाचे संयुक्त उमेदवार होते. या लोकसभा निवडणुकीतही भाजपने मुरादाबादमधून कुंवर सर्वेश यांना उमेदवारी दिली होती आणि त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी सपाच्या रुची वीरा यांना मानले जात होते.
कुंवर सर्वेश हे मुरादाबाद जिल्ह्यातील ठाकूरद्वारा विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा आमदारही राहिले आहेत. त्यांचे वडील रामपाल सिंग 1984 मध्ये काँग्रेसकडून अमरोहामधून खासदार म्हणून निवडून आले होते. माजी खासदार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले आहे की, “मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार आणि माजी खासदार कुंवर सर्वेश सिंह यांच्या निधनाने धक्का बसला आहे. हे भाजप परिवाराचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे.