पाटणा : महाराष्ट्रातील रहिवाशी असलेले बिहार केडरमधील आयपीएस शिवदीप लांडे यांनी पोलीस सेवेचा राजीनामा दिला आहे. लांडे यांनी अचानक राजीनामा दिल्याने बिहार, महाराष्ट्रच नाही तर देशभरात चर्चा सुरु झाल्या आहेत.
शिवदीप लांडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. या पोस्टमध्ये शिवदीप लांडे यांनी म्हटले आहे की, प्रिय बिहार, गेली 18 वर्षे सरकारी पदाच्या माध्यमातून सेवा केल्यानंतर मी आता माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. माझ्या या सगळ्या कार्यकाळात मी बिहार राज्याला स्वत:पेक्षा आणि कुटुंबापेक्षा सर्वोच्च मानले आहे. माझ्या सेवेच्या काळात माझ्याकडून कोणतीही चुकभूल झाली असेल तर मी त्यासाठी क्षमस्व आहे. मी भारतीय पोलीस सेवेतून राजीनामा दिला आहे. मात्र, मी बिहारमध्येच राहणार आहे. यापुढेही बिहार हीच माझी कर्मभूमी असेल, असे शिवदीप लांडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले आहे.
महाराष्ट्रातील असलेले शिवदीप लांडे सिंघम आयपीएस म्हणून लोकप्रिय झाले आहे. आपल्या कामगिरीने त्यांनी बिहारमधील लाखो युवकांच्या मनात घर केले आहे. बिहारच्या प्रत्येक जिल्ह्यात लांडे यांचे प्रचंड चाहते आहेत. शिवदीप लांडे हे मध्यतरी मुंबईत महाराष्ट्र पोलिस सेवेतही कार्यरत होते. लांडे हे शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत. त्यांनी मुंबईत अमली पदार्थ विरोधी पथकात कार्यरत असतानाही प्रभावी कामगिरी करत ड्रग्ज तस्करांचे कंबरडे मोडले होते. तर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त असताना अनेक महत्वाचे गुन्हे उघडकीस आणले होते.