छपरा : बिहारच्या सारण जिल्ह्यात एका बोगस डॉक्टरने यूट्यूबवरील व्हिडीओ बघून एका युवकाच्या पित्ताशयातून मुतखडा काढण्यासाठी शस्त्रक्रिया केली. मात्र या शस्त्रक्रियेनंतर त्या युवकाची तब्येत अधिकच बिघडली आणि पाटण्यातील रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या बोगस डॉक्टरने त्या मुलाचा मृतदेह वाटेतच टाकून पळ काढला.
अजितकुमार पुरी असे या बोगस डॉक्टरचे नाव आहे. रविवारी रात्री त्याला गोपालगंज जिल्ह्यातून अटक करण्यात आली. सारणचे पोलीस अधीक्षक आशीष कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार सारणच्या भुआलपूर गावातील कृष्ण कुमार ऊर्फ गोलू या १५ वर्षीय मुलाच्या पोटात दुखत असल्याने त्याला कुटुंबीयांनी पुरीच्या दवाखान्यात नेले. या बोगस डॉक्टरने गोलूच्या पित्ताशयातील खडा काढण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सांगितले.
अजित कुमारने गोलूचे वडील, आजोबांना डिझेल आणण्यासाठी पाठवले आणि त्यादरम्यान कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय गोलूवर शस्त्रक्रिया सुरू केली. हा बोगस डॉक्टर आणि त्याच्या रुग्णालयातील कर्मचारी यूट्यूबवर बघून शस्त्रक्रिया करत होते. शस्त्रक्रियेनंतर गोलूची तब्येत अजूनच बिघडली. त्यामुळे त्याला पाटण्याला नेण्याचा निर्णय घेण्यात आला.
रुग्णवाहिकेतून पाटण्याला नेत असताना वाटेतच गोलूचा मृत्यू झाला. यानंतर अजितकुमारने गोलूचा मृतदेह आणि त्याच्या आईला वाटेतच सोडून तेथून पळ काढला. मृत मुलाच्या -कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार अजितकुमारला रविवारी अटक करण्यात आली असून त्याच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा शोध सुरू आहे. त्याच्या रुग्णालयाला सील करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात अजून असे किती बोगस डॉक्टर आहेत, याचा छडा लावण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.